Welcome to ज्ञानविश्व न्यूज़   Click to listen highlighted text! Welcome to ज्ञानविश्व न्यूज़
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर, समोर आलं राज’कारण’; धोंडे जेवणामुळे बंडू जाधवही अनुपस्थित

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होत असलेल्या आजच्या खासदार बैठकीला दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्यचे अनिल देसाई, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि नाशिकमधील राजाभाऊ वाजे उपस्थित आहेत.

मुंबई : राज्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवली आहे. मात्र, ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 4 खासदारांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, ठाकरेंच्या आजच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकरांचीही (Omraje nimbalkar) अनुपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, ओमराजे यांचा मुलगा पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते बैठकीला नसल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होत असलेल्या आजच्या खासदार बैठकीला दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्यचे अनिल देसाई, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि नाशिकमधील राजाभाऊ वाजे उपस्थित आहेत. तर, हिंगोलीतील नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळमधील संजय देशमुख यांनी ऑनलाईन हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे परभणीतील संजय जाधव अनुपस्थित असून धोंड्याचा महिन्यातील शेवटचा दिवस असल्याने ते मतदारसंघातील विविध कार्यक्रमात आहेत. तर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हेही उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्या मुलाला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते येणार नाहीत, अशी माहिती आहे. तर, शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे, मातोश्रीवरील आजच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे कोणकोणते खासदार उपस्थित राहतात हे पाहावे लागेल.

खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित (धाराशिव) 

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या बैठकीला ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही पद्धतीने उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्या मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ओमराजे पुण्यात असून, त्यांनी याबाबतचा निरोप पक्षाचे नेते अनिल देसाई यांच्याकडे पाठवला आहे.

खासदार संजय जाधव (परभणी) – ‘धोंडे जेवण’ कार्यक्रम

परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या ‘धोंडे जेवणाच्या’ कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नसल्याचे समोर आले आहे. मात्र, सुरुवातीला त्यांच्याकडून पक्षाला कोणतेही स्पष्टीकरण न गेल्याने काही काळ चिंतेचे वातावरण होते.

दोन खासदार ऑनलाईन

संजय देशमुख (खासदार, यवतमाळ): पुढच्या महिन्यात मुलीचे लग्न असल्याने ते मुंबईला येऊ शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

नागेश पाटील-आष्टीकर (खासदार, हिंगोली): सध्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने ते मतदारसंघात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांनीही ऑनलाईन हजेरी नोंदवली.

शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल आहेत.

7 खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. जरी काही खासदार वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे गैरहजर असले, तरी शिर्डीचे खासदार वाकचौरे ऐनवेळी ‘नॉट रिचेबल’ असणे ठाकरे गटाची धाकधूक वाढवणारे ठरत आहे. आता या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित खासदारांना काय कानमंत्र देतात? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!