Welcome to ज्ञानविश्व न्यूज़   Click to listen highlighted text! Welcome to ज्ञानविश्व न्यूज़
महाराष्ट्र

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन

मातंग समाजासह  लाभवंचित जातींचा सहभाग; जिल्ह्यात जनसंवाद बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन
मातंग समाजासह  लाभवंचित जातींचा सहभाग; जिल्ह्यात जनसंवाद बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, प्रतिनिधी :  स्वातंत्र्यप्राप्तीच्या ऐंशी वर्षांनंतरही संविधानाने अपेक्षित केलेल्या सामाजिक न्यायाचा लाभ अनुसूचित जातसमूहाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला नसल्याने महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे. या मागणीसाठी १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाची सुरुवात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता होणार आहे. या आंदोलनात मातंग समाजासह अनुसूचित जातीतील इतर लाभवंचित जाती सहभागी होणार आहेत.
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्य सरकारांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात उपवर्गीकरण करण्याचा मार्ग खुला केला आहे. या निर्णयानंतर विविध राज्यांनी या दिशेने पावले उचलली असताना महाराष्ट्रातील लाभवंचित जातींना मात्र अद्याप आरक्षण उपवर्गीकरणाची प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ होणार्‍या या जनआक्रोश महामोर्चाच्या आयोजनासाठी सकल मातंग समाज व अनुसूचित जातीतील लाभवंचित समाज घटकांची आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महामोर्चाची जय्यत तयारी सुरू असून समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रंदिवस महामोर्चाच्या नियोजनात व्यस्त आहेत.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ जनआक्रोश महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती आणि जनसंवाद बैठका आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत मुखेड, माहूर, हदगाव, बारड, उमरखेड, डोंगरगाव, उमरी,  धर्माबाद, देगलूर आणि नायगाव येथे बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा प्रत्येक लाभवंचित जातीपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीच्या वतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकसह विविध राज्यांनी अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच देशातील इतर राज्यांमधूनही अतीमागास जातसमूहाकडून अनुसूचित जातींच्या आरक्षाची मागणी जोर धरत आहे. मात्र महाराष्ट्रात या मागणीला काही स्तरांतून विरोध होत असल्याने उपवर्गीकरणाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या तसेच प्रतिनिधित्वापासून वंचित असलेल्या जातींना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी महामोर्चाची प्रमुख मागणी आहे.  महाराष्ट्रात अतिमागास लाभवंचित ४४ अनुसूचित जातींच्या समूहाचा अ गट आणि प्रगत १५ जातींचा ब गट असे दोन गट तयार करुन हे उपवर्गीकरण करावे अशी मागणी आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या जात समूहाच्या मागासलेपणावर आधारीत या दोन्ही गटांची आरक्षण उपवर्गीकरण टक्केवारी निश्चित करावी अशी महामोर्चाची मागणी आहे.
आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचावा, लाभवंचित समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे आणि संविधानातील सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, या उद्देशाने हा जनआक्रोश महामोर्चा आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. नांदेड हा मातंग समाजाच्या क्रांतीचा जिल्हा आहे. याच भूमीतून आरक्षण उपवर्गीकरणासाठी रणशिंग फुंकून सरकारला लाभवंचित समाजाच्या न्याय्य मागणीची जाणीव करून दिली जाईल, असा निर्धार आंदोलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे.
१३ सप्टेंबर २०२६ रोजी होणार्‍या या महामोर्चात मातंग समाजासह इतर लाभवंचित जातींचे समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, नांदेडच्या भूमीतून आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीचा बुलंद आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने तातडीने उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन लाभवंचित जातींसाठी सामाजिक न्याय आणि योग्य प्रतिनिधित्वाचा मार्ग मोकळा करावा, अशी प्रमुख मागणी या जनआक्रोश महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या महामोर्चात नांदेड जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मातंग समाजातील आणि लाभ वंचित अनुसूचित जातीच्या बंधू-भगिनींनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अविनाश घाटे, मारुती वाडेकर, केशव शेकापूरकर,
लालबाजी घाटे, प्रितम गवाले, गंगाधर कावडे, सतीश कावडे, भारत सरोदे आदिंची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!